Tuesday, 8 December 2020

एकट्याचा प्रवास !

बकेटलिस्ट मधल्या गोष्टी पूर्ण होत राहतात त्याच वेगाने त्या वाढतात सुद्धा, कामं तर काय कायमचं चालू असतात. पैश्यांच सुद्धा आयुष्यात येणं जाणं हे तर कधीही न संपणारं आहे. पण मग ही सगळी सायकल चालू असताना मला हा प्रश्न पडतो की या सगळ्यात मी कुठे आहे ? मी सगळं करतोय त्यातून मला काय मिळतंय ? कारण आयुष्याचा प्रवास करत असताना या सगळ्या गोष्टी न संपणाऱ्या आहेत ज्या कायम सोबत असतील.

अर्थात कितीही आवडतं काम असेल, त्या कामातून कितीही आनंद मिळत असेल तरी सुद्धा तो आनंद पुरेसा नसतोच ना, आयुष्यात काहीतरी वेगळेपणा गरजेचाच असतो. मग मला असं वाटतं की माझा आनंद फिरण्यात आहे, नवीन लोकांना नवीन ठिकाणांना भेटण्यात आहे, नवीन पदार्थ खाण्यात आहे आणि मग याच आनंदाच्या शोधात मग मी फिरायला बाहेर पडतो.

तसं पाहायला गेलं तर भटकणं हा आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रविवार येतो, सुट्ट्या येतात, माझं फिरणं हे घरात सुद्धा आता इतकं सवयीचं झालं आहे की एखाद्या सुट्टीच्या दिवशी काही काम नसताना घरी असेल तर आई सुद्धा बोलते की आज दिवस पश्चिमेला उगवला की काय ? अनेकानेक दौरे चालू असताना मग या फिरण्यात सुद्धा एक वेगळा प्रकार येतो तो म्हणजे सोलो ट्रिप.

मी मागच्या वर्षी सुद्धा आठ दिवस काशीला गेलो होतो एकटाच, बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की यार तू एकटा फिरतो तुला बोअर नाही होत ? तुला कंटाळा नाही येत ? आणि अजूनही खूप सारे प्रश्न ज्यांवर मी फक्त हसून उत्तर देतो की जर मला हे सगळं कंटाळवाणे वाटत असतं तर मी केलं असतं ? तुम्हाला माहितीये आयुष्यात ना ब्रेक्स फार महत्वाचे असतात, कितीही भरलेलं शेड्युल असुदेत, कितीही महत्वाचे कामं असुदेत पण हे सगळं करत असताना आत्मिक आनंद मिळत नसेल तर एक ब्रेकतो बनता है ना बॉस.

मग वर्षातून असा एक मोठा ब्रेक घेऊन मी सोलोट्रीपवर निघतो, इथे अगदी काहीच निश्चित नसतं. ना कुठले बुकिंग्स असतात ना दिवस ठरलेले असतात. कारण इथे फक्त आनंद मिळेल ते करायचं असतं. मन नाही भरलं तर आहे तिथेच थांबायचं, वाटेल तिथे मिळेल ते खायचं. या सगळ्या गोष्टी अनिश्चित असल्या तरी माझ्यासाठी प्रचंड एक्सायटिंग असतात, आणि असंही माणसात फ्लेक्सिब्लिटी असेल तर तो कुठेही आनंदाने राहूच शकतो. सोलोट्रीपवर असताना अनेक नवनवीन लोकं भेटतात, काही लोकांसोबत तर इतकी वेव्ह लेंथ मॅच होते की असं वाटतं यार कै ये मेरा मेले मे बिछडा हुआ भाई तो नही ! मस्त Ambience असलेल्या कॅफे मध्ये संध्याकाळी बसून चिल करणं असेल किंवा तिथे भेटलेल्या रँडम लोकांसोबत वेगवेगळे कन्फेशन्स करणं असेल हे सगळं मला प्रचंड आनंद देऊन जातं ही सगळी मजा मला फक्त सोलोट्रीपच देऊ शकते असं मला वाटतं.

(फोटो - Pinterest)

हंपीची सोलोट्रीपसुद्धा अशीच अविस्मरणीय होती, जेव्हापासून या जागेबद्दल माहिती झालं होतं तेव्हाच ठरवलेलं की इकडे जायचं तर एकट्यानेच ! काहीच प्लॅन नव्हता, फक्त जायचं आणि आपल्याला आनंद देतील त्या गोष्टी करायच्या इतकंच ठरवलेलं. मग आनंद देणाऱ्या गोष्टी म्हणजे मला आवडलेले पदार्थ मनसोक्त खाणं असेल, नवीन लोकांना भेटणं असेल किंवा मग कुठेतरी निवांत मावळत्या सूर्याला शांतपणे पाहत असणं असेल या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे प्रचंड आनंददायी असतात.

मागच्या वर्षीच्या वाराणसीच्या दौऱ्यात काही विदेशी मित्र भेटले होते, आम्ही सगळे काशीच्या त्या आल्हाददायक थंडीत बोटीत बसून धुक्यात दडलेल्या गंगेची बोटीने सफर करत होतो, काही वेळाने सूर्योदय व्हायला सुरुवात झाली आणि उदयास येऊ लागलेल्या त्या लाल गोळ्याची किरणं गंगेवर पसरलेल्या धुक्यावर पडायला लागली. हे सगळं समोर होत असताना मागून अलवार पणे बासरीचे स्वर ऐकू यायला लागले, पाहतो तर तो आमच्यापैकीच एक विदेशी मित्र होता हे सगळं इतकं सुंदर होतं की मी सवयीप्रमाणे खिशातून फोन काढला आणि व्हिडिओ घेण्याचा विचार करू लागलो, मी फोन काढल्याच्या नंतर सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले मला थोडं Awkward वाटलं म्हणून मी फोन ठेऊन दिला आणि तो क्षण अनुभवण्यात विलीन झालो. 

या बोट राईडच्या नंतर मला बोटीत असलेल्या विदेशी मित्रांपैकी एकाने हा प्रश्न विचारला की तू इथे का आला आहेस ? साहजिकच माझं उत्तर होतं मला आनंद मिळण्यासाठी त्यावर तो म्हणाला की जर तुला आनंद मिळवण्यासाठी आला आहेस तर हे क्षण एन्जॉय का नाही करत ? तुझा आनंद हा अनुभव घेण्यात आहे ना की तो रेकॉर्ड करून जगाला दाखवण्यात. त्या क्षणापासून एक गोष्ट क्लिअर झाली की समोर असणारा क्षण ना क्षण जगून घ्यायचा, कारण त्यापेक्षा अनमोल असं काहीच नसतं !

बऱ्याचदा कुठेतरी बसलेलो असताना एकदम सुंदर वातावरण होतं, कधीकधी सूर्यास्त वगैरे असतो. मित्र लाईव्ह चालू करतात कोणी व्हिडिओ काढत असतं मला हे सगळं पाहून विचित्र वाटतं पण मी इग्नोर करतो

मागे न एक कविता वाचलेली, कवितेचा असा सार होता की वस्तू सुद्धा बोलतात, कथा सांगतात हे वाचून जरा वेगळं वाटलं होतं पण यावेळी हंपीत असताना लिटरली ते अनुभवलं, विजय विठ्ठल मंदिरातले ते खांब, त्या खांबावर असणारी नक्षीदार शिल्प हे सगळे जणू आपल्याशी संवाद करत आहेत असं वाटत होतं. अगदी भग्न झालेले माही अवशेष त्यांचा मोठ्या अभिमानाने इतिहास सांगत होत्या तो ऐकू येत होता, इतकंच नाही तर मातंग पर्वतावरून उगवताना दिसणारा सूर्य मला कडकाच्या थंडीत ऊर्जा देत होता तर हेमकूटावरून मावळणारा सूर्य मला शेवट सुद्धा किती सुंदर असू शकतो याची जाणीव करून देत होता.

हे सगळं पाहत असताना जी तंद्री लागते ना ती कमाल असते, माणूस सगळं विसरून त्या गोष्टींमध्ये इतका विलीन होतो की त्या सगळ्या प्रतिमा, वेगवेगळ्या अँगलने टिपलेल्या वेगवेगळ्या फ्रेम्स हे सगळं मनात अगदी खोलवर कोरलं जातं.

गेल्या काही दिवसात पाहिलेल्या काही गोष्टी इतक्या जगल्या आहेत की आता काही फोटो काढलेले असतात ते पाहण्याची इच्छा सुद्धा होत नाही, या जगलेल्या गोष्टींवर जर लिहायचं ठरवलं तर हजारेक शब्द सहज लिहून होतील हे असं बोलणं कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण कधीतरी जर हे असे क्षण स्वतःसाठी जगले असाल तर हे नक्कीच रियलाईझ होईल.

तन्वीर सिद्दीकीची एक कविता आहे, तो म्हणतो की

"काही कागद चुरगळून फेका, काही कागद कोरेच ठेवा.
सगळ्याच आठवणी लिहायच्या नसतात,
लिहू सुद्धा नका !
काही क्षण असेच कायम तुमच्या सोबत असुद्यात"

किती सुंदर आहे ना हे सगळं ? तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फक्त फोटो काढलेले असतील ते तुम्हाला शेकडो लाईस वगैरे मिळवून देतील सुद्धा पण तो क्षण जो मी जगेल तो मला त्या लाईक्सपेक्षा जास्त आनंद देणारा असेल, अगदी आयुष्यभरासाठी म्हटलं तरी सुद्धा !

श्रीपाद कुलकर्णी
०२/१२/२०२०