Friday, 29 October 2021

Sometimes saying let it be is good choice !

मागे माझा वाढदिवस झाला, वाढदिवसाचे प्लॅन्स कोणाचे नसतात यार, अर्थात, माझे सुद्धा होते पण त्याच दिवशी पुढे दसरा असल्याने इतकी कामं सुरू होती की फोन घ्यायला सुद्धा वेळ मिळत नव्हता, बाहेर जाणे वगैरे तर फारच लांबची गोष्ट... पण मला काम करायला आवडतं, हातात असलेली कामं पूर्ण करणं ही माझी पहिली प्रायोरिटी असते, त्यामुळे त्या दिवसाबद्दल तक्रार अशी अज्जिबात नव्हती. 

नंतर दसरा झाला, थोडासा निवांत झालो, रविवारी मस्त घरात बसून चिल्ल करू म्हटलं, पण विकेंडला शांत बसण्याची सवय नसल्याने त्यात पण बोअर झालो, मग मित्राला फोन केला आणि म्हटलं उद्या ट्रेकला जाऊयात का ? अगदी शब्द पडायचा उशीर, सकाळीच एक ट्रेक लीड करून परत आलेला तो, लगेच हो म्हणाला आणि आमचा प्लॅन फिक्स झाला !

आपल्यासारखेच मित्र असल्याचा हा फायदा असतो, कधीही, कुठल्याही प्लॅन्सला ते तयार होतात, त्यांची नाटकं नसतात आणि विशेष गंमत म्हणजे असं सगळं असूनही यांच्या बायो मध्ये कधी वंडरलस्ट किंवा ट्रॅव्हलर वगैरे शब्द तुम्हाला सापडणार नाहीत ! असो, तो भाग अलहिदा..

सगळे लोकं जेव्हा सोमवारी मंडे ब्लुज फेस करत होते तेव्हा सकाळी आम्ही मात्र मस्त राजगडकडे जायला निघालो, रस्त्यात मित्रांना भेटलो, त्यातच एक मित्र म्हणाला चल मी पण येतो, पुढच्या पंधरा मिनिटात तो सुद्धा आम्हाला जॉईन झाला आणि आम्ही राजगडाच्या दिशेने गाड्या काढल्या..

जाताना मस्त निवांत जेवण वगैरे करत गेल्याने बेस व्हिलेजपर्यंत जायला दुपार झाली होती, ऑक्टोबर हिट म्हणजे काय असतं ते अगदी चांगलंच जाणवत होतं अशा परिस्थितीत पाली दरवाज्याच्या बाजूने राजगड चढण्यास सुरुवात केली व मस्त रमत गमत ४.३० ला गडावर पोहचलो, पाली दरवाज्यातच थोडं अंग टाकलं नंतर पद्मावती माचीवर जात टाक्यातल्या थंड पाण्याने तोंड धुतलं, फ्रेश झालो आणि संजीवनीकडे सुर्यास्तासाठी गेलो, अगदी समोर दिसणारे किल्ले मनसोक्त पाहिले, संजीवनीमाचीवरून दिसणाऱ्या सूर्यास्ताचं वर्णन शब्दांत शक्य नाही ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

सगळं अगदी साग्रसंगीत झालं, रात्री शेकोटी पेटवून गप्पा मारत असताना सहज आकाशात लक्ष गेलं आणि कळलं की आज तर कोजागिरी आहे आणि मागच्या कोजागिरीला सुद्धा आपण राजगडावरच होतो. माझा जन्म सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा असल्याने तारखेने नाही तर तिथीने, मणिध्यानी नसताना वाढदिवसाचा प्लॅन तर सक्सेस झाला होता.

अगदी एकांत असलेल्या किल्ल्यावर पौर्णिमेचा शीतल चंद्र सोबतीच्या लुकलूकणार्या चांदण्या पाहत दिवस संपावा, स्वतः अगदी आनंदी असावं यापेक्षा दुसरं सुख ते कुठलं नाही का ? हेच चंद्र तारे पाहत चिलखती बुरूजावर टेंट लावून आम्ही आता सूर्योदय पाहण्यासाठी अलार्म लावत आडवे झालो.. 

सकाळी लवकर उठून सुवेळावरून त्या उगवत्या सूर्याची किरणं अंगावर घेत दुसरा दिवस सुरू झाला. समोर पसरलेले ढग, बोचणारी थंडी आणि समोरून ऊब देणारी किरणं हा संगम एन्जॉय करून सुवेळाकडून आम्ही काळेश्वरीला जायला निघालो, काळेश्वरीवरून वर चढत नंतर बालेकिल्ला केला आणि खाली उतरायला सुरुवात केली..

अचानक काही तास आधी ठरलेला हा प्लॅन अत्यंत आनंददायी आणि मनाला सुखावणारा होता, क्रीएटीव्ह फिल्ड मध्ये काम करत असताना तुम्हाला या गोष्टी कायमच गरजेच्या असतात, त्यामुळे असा एखादा अचानक सोमवारचा ब्रेक नक्की ऍडजस्ट करावा आणि स्वतःला वेळ द्यावा...

वाढदिवसाच्या दिवशी बाहेर जाणं जमलं नव्हतं, पण कदाचित याही वर्षी कोजागिरीला राजगडावरच जाण्याचा योग असावा म्हणून त्या गोष्टीचं तेव्हा वाईटही वाटलं नाही, म्हणूनच प्रत्येक वेळेस जास्त ताण न घेता गोष्टी होतील तशा होऊ द्याव्यात, बाकी युनिव्हर्सवर सोडावं, कारण कधीकधी यामुळे आलेले रिझल्ट मनाला फार सुखावणारे असतात...!

#shreewrites