Monday, 20 December 2021

Scrapbook 1 | Elena

फिरण्याच्या मागे असणार्या असंख्य कारणांपैकी एक म्हणजे माणसांच्या गोष्टी ऐकणे, गप्पा मारणे आणि नवीन लोकं जोडणे..

हेच नवीन लोकं जोडत असताना सहज मनात आलं की आपण याचं एक स्क्रॅपबुक का करू नये, स्क्रॅपबुक जरी मर्यादित लोकांसाठी असलं, जरासं खाजगी असलं तरीही आजच्या इंटरनेटच्या जगात कुठे म्हणावी अशी प्रायव्हसी राहिली आहे तेव्हा मी हे पब्लिक केल्याने काही फरक पडेल..

तर माझ्या या स्क्रॅपबुक च्या पहिल्या पानावर येण्याचा मान एलिनाचा, आत्ता इतक्यातच बनारसच्या सोलो ट्रिपवर होतो तेव्हा भेटलेल्या काही खास व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे एलिना !

तशी ती इटलीची, आणि फक्त इटलीचीच नाही तर इटलीतल्या रोम मधली.. टुरिझम फिल्ड मध्ये काम करत, आपल्या आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ पैसे कमावण्यासाठी या मॅडम जगत होत्या, स्वतः ट्रॅव्हल फिल्ड मध्ये असल्याने फिरण्याची आवड तर होतीच, असंच फिरत फिरत या बाई पोहचल्या बनारस मध्ये, त्या इकडे येतात काय, काही दिवस राहतात काय आणि अगदी इकडच्याच होऊन जातात काय हे प्रचंड भारी आहे आणि कदाचित यामुळेच मला तिच्याबद्दल लिहावं वाटत असेल..

ती जनरली तुम्हाला घाटावर भेटेल, कुठल्यातरी भिकारीसारख्या माणसासोबत चहा पिताना किंवा एखाद्या साधू सोबत जॉइंट मारताना किंवा अगदीच कधी कुत्र्यांसोबत खेळत असेल. आम्ही सुद्धा असेच काहीसे भेटलो, घाटावर बसलेलो असताना हाय हॅलो झालं आणि मग पुढे नाव गावाची चौकशी झाल्यावर बनारस बद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्याकडे असणार्या ऐतिहासिक वास्तू रोम मधल्या काही वास्तू त्यात असणारं साम्य यावर सुद्धा ती सांगत होती. मी सुद्धा नगरच्या काही ऐतिहासिक वास्तूंचे फोटो दाखवले तेव्हा 'इंडिया इस सो ब्युटीफुल बट कंपेअरली ईट्स व्हेरी अंडररेटेड' असे उद्गार निघाले जरा गप्पा झाल्यावर आणि मी सुद्धा टुरिझम कंपनीसाठी काम करतो हे समजल्यावर आमचे नंबर्स आणि इंस्टाग्राम आयडी एक्सचेंज झाले, मी आठवणीने सेल्फी घेतला आणि परत भेटू या नोट वर निरोप झाला.

२ दिवसांनी तिचा मेसेज आल्यावर आम्ही परत एका सकाळी पांडे घाटापासल्या नंदेय कॉफी शॉपला भेटलो, यावेळी बोलताना असलेला विषय हा फक्त भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्र हा होता. हातात बांगड्या, पायांत पैंजण, टिकली, आणि वर शेंदूर इतका अगदी टिपिकल बनारसी बाई सारखा तिचा पेहराव होता. एखादी व्यक्ती एखादी संस्कृती इतक्या लवकर कशी अंगीकारु शकते या गोष्टीचं मला फार कौतुक वाटलं, मी तिला जेव्हा हे विचारलं तेव्हा तिने तिचा या गोष्टींवरचा तिचा दृष्टिकोन सांगितला, आपली संस्कृती एखाद्याला इतकी आवडते हे ऐकून मला छान वाटलं. कोरोना मुळे कित्येक वाईट गोष्टी झाल्या असतील पण एलिना सांगते की लॉकडाउन लागण्यामुळे तिला इकडे राहावं लागलं, आधी जरा नकोसं झालेलं पण हळूहळू बनारसच्या प्रेमात या बाई पडल्या आणि आता यांचा पाय निघत नाहीये.

स्वतःचं भाड्याने घर घेऊन ती बनारसमध्ये राहतेय, तिला इकडे साधारणपणे वर्ष झालं  आहे आणि पुढे अजून किती दिवस असणार हे विचारलं की ती फक्त 'शिवा नोज' असं हसून सांगते. महादेवावर प्रचंड श्रद्धा आहे तिची, इतकी की तिने आजवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी ८ ज्योतिर्लिंगांना भेट सुद्धा दिली आहे. अजिंठा, वेरूळ तिला फारच आवडलं आहे तर ती शिर्डी ला पण येऊन गेली आहे थोडक्यात काय तर या मॅडम आता नॅशनलिटी सोडली तर भारतीय झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही...

सध्या फ्रीलांस टूर डिझायनर म्हणून ती काम करत गरजेपुरते पैसे कमावते... ती सांगते मी माझं आजवरचं आयुष्य संसारासाठी आणि पैसे कमावण्यासाठी घातलं, त्यात चांगले पैसे सुद्धा कमावले, भरभरून सहजीवन जगले, सेव्हिंगस सुद्धा आहेत पण आता माझी माझ्यासाठी जगण्याची वेळ आली आहे, मी किती दिवस अशी जगेल माहिती पण पण मला हे आवडतं आहे आणि मी जीवनाचा आनंद घेत आहे.

आत्ता हे सगळं जरा विचित्र वाटेल, मागे असणाऱ्या लोकांचं काय, भविष्याचं काय वगैरे प्रश्न सुद्धा पडतील पण हे असे प्रश्न मुसाफिरांना पडतही नाहीत आणि त्यांना कोणी विचारू ही नये कारण या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर कदाचित जगणं राहून जाईल...!

#shreewrites 
#Scrapbook_of_shree 

१६/१२/२०२१