आपल्याला सगळ्यांनाच रोज चालू असलेल्या आपल्या नियमित जीवनाचा कंटाळा कधीतरी येतोच ना? मग मनात कसबस होत अस्वस्थ वाटायला लागतं. मग अश्या वेळी जरा माझं एका आणि मी सांगतो तस जगून पहा ना...
पळापळीतुन निवांत आपला एक दिवस काढायचा, फोन ला सुट्टी द्यायची, कॅमेरा घ्यायचा सोबत.. कोणी असू नसू आपण आपलं निघायचं. निसर्गात हरवून जायचं. ते सौंदर्य अनुभवायचं. डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवायच.हेडफोन्स न लावता वाऱ्याच्या संगतीने पक्षी गात असलेलं संगीत ऐकायचं. तहान लागली की झऱ्याच/टाक्यातल मस्त गार पाणी पोटभर प्यायचं. दम लागला की झाडाच्या सावलीत अंग टाकून द्यायचं.
सगळं फिरून झालं की पोटात भुकेने व्याकुळ झालेलं कावळे केव्हाच ओरडायला लागलेले असतात, मग नकळत पाऊले निघतात ती आज्जीच्या झोपडी कडे, जसे जसे जवळ पोहचू तसा तसा त्या चुलीवर शिजणार्या गडकिल्यांच्या खोऱ्यात पिकलेल्या तांदळाच्या भाताचा चुलीवर शिजत असतानाचा सुवास येऊ लागतो. आणि हा असा भात मला नाही वाटत जगात कुठे मिळत असावा.. नंतर तिथे पोहचताच मस्त लिंबू सरबत प्यायचं, आणि फ्रेश व्हायचं. तोवर आज्जीच्या घरच्यांनी गरम गरम भाकरी भाजीच ताट वाढलेलं असत, असेल त्या बेतावर यथेच्छ ताव मारायचा...
इथे आपली मज्जा असते, ही लोक जेवण हे सेवा म्हणून देतात. तिथे फक्त नफा कमावणे हा उद्देश कधीच नसतो.तुम्हाला हवं तसं ताटात आनंदाने वाढलं जात, ते खायचं कारण त्या चुलीवरच्या जेवणाची सर कुठल्याच जेवणाला कधीच येऊ शकत नाही. हे सगळ होईपर्यंत सूर्य ढळायला आलेला असतो, वेळ होते, आणि मग तिन्हीसांजेच्या वेळेला परतीच्या प्रवासाच्या दिशेने पाऊल वाट चालायला लागतात....या सगळ्यात मिळालेली मानसिक ऊर्जा पुढच्या प्रवासापर्यंत जगण्यासाठी पुरेशी असते...
आणि हो तुम्हाला माहितीये, या आज्जीच्या झोपडीत भलेही लाईट नसेल,पण इथून तृप्त झालेल्या जीवांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाने ही झोपडी किती उजळून निघत असेल हे वेगळं सांगायला नको....
भटक्याच्या डायरीतुन
20/01/2020
