Tuesday, 8 December 2020

एकट्याचा प्रवास !

बकेटलिस्ट मधल्या गोष्टी पूर्ण होत राहतात त्याच वेगाने त्या वाढतात सुद्धा, कामं तर काय कायमचं चालू असतात. पैश्यांच सुद्धा आयुष्यात येणं जाणं हे तर कधीही न संपणारं आहे. पण मग ही सगळी सायकल चालू असताना मला हा प्रश्न पडतो की या सगळ्यात मी कुठे आहे ? मी सगळं करतोय त्यातून मला काय मिळतंय ? कारण आयुष्याचा प्रवास करत असताना या सगळ्या गोष्टी न संपणाऱ्या आहेत ज्या कायम सोबत असतील.

अर्थात कितीही आवडतं काम असेल, त्या कामातून कितीही आनंद मिळत असेल तरी सुद्धा तो आनंद पुरेसा नसतोच ना, आयुष्यात काहीतरी वेगळेपणा गरजेचाच असतो. मग मला असं वाटतं की माझा आनंद फिरण्यात आहे, नवीन लोकांना नवीन ठिकाणांना भेटण्यात आहे, नवीन पदार्थ खाण्यात आहे आणि मग याच आनंदाच्या शोधात मग मी फिरायला बाहेर पडतो.

तसं पाहायला गेलं तर भटकणं हा आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रविवार येतो, सुट्ट्या येतात, माझं फिरणं हे घरात सुद्धा आता इतकं सवयीचं झालं आहे की एखाद्या सुट्टीच्या दिवशी काही काम नसताना घरी असेल तर आई सुद्धा बोलते की आज दिवस पश्चिमेला उगवला की काय ? अनेकानेक दौरे चालू असताना मग या फिरण्यात सुद्धा एक वेगळा प्रकार येतो तो म्हणजे सोलो ट्रिप.

मी मागच्या वर्षी सुद्धा आठ दिवस काशीला गेलो होतो एकटाच, बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की यार तू एकटा फिरतो तुला बोअर नाही होत ? तुला कंटाळा नाही येत ? आणि अजूनही खूप सारे प्रश्न ज्यांवर मी फक्त हसून उत्तर देतो की जर मला हे सगळं कंटाळवाणे वाटत असतं तर मी केलं असतं ? तुम्हाला माहितीये आयुष्यात ना ब्रेक्स फार महत्वाचे असतात, कितीही भरलेलं शेड्युल असुदेत, कितीही महत्वाचे कामं असुदेत पण हे सगळं करत असताना आत्मिक आनंद मिळत नसेल तर एक ब्रेकतो बनता है ना बॉस.

मग वर्षातून असा एक मोठा ब्रेक घेऊन मी सोलोट्रीपवर निघतो, इथे अगदी काहीच निश्चित नसतं. ना कुठले बुकिंग्स असतात ना दिवस ठरलेले असतात. कारण इथे फक्त आनंद मिळेल ते करायचं असतं. मन नाही भरलं तर आहे तिथेच थांबायचं, वाटेल तिथे मिळेल ते खायचं. या सगळ्या गोष्टी अनिश्चित असल्या तरी माझ्यासाठी प्रचंड एक्सायटिंग असतात, आणि असंही माणसात फ्लेक्सिब्लिटी असेल तर तो कुठेही आनंदाने राहूच शकतो. सोलोट्रीपवर असताना अनेक नवनवीन लोकं भेटतात, काही लोकांसोबत तर इतकी वेव्ह लेंथ मॅच होते की असं वाटतं यार कै ये मेरा मेले मे बिछडा हुआ भाई तो नही ! मस्त Ambience असलेल्या कॅफे मध्ये संध्याकाळी बसून चिल करणं असेल किंवा तिथे भेटलेल्या रँडम लोकांसोबत वेगवेगळे कन्फेशन्स करणं असेल हे सगळं मला प्रचंड आनंद देऊन जातं ही सगळी मजा मला फक्त सोलोट्रीपच देऊ शकते असं मला वाटतं.

(फोटो - Pinterest)

हंपीची सोलोट्रीपसुद्धा अशीच अविस्मरणीय होती, जेव्हापासून या जागेबद्दल माहिती झालं होतं तेव्हाच ठरवलेलं की इकडे जायचं तर एकट्यानेच ! काहीच प्लॅन नव्हता, फक्त जायचं आणि आपल्याला आनंद देतील त्या गोष्टी करायच्या इतकंच ठरवलेलं. मग आनंद देणाऱ्या गोष्टी म्हणजे मला आवडलेले पदार्थ मनसोक्त खाणं असेल, नवीन लोकांना भेटणं असेल किंवा मग कुठेतरी निवांत मावळत्या सूर्याला शांतपणे पाहत असणं असेल या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे प्रचंड आनंददायी असतात.

मागच्या वर्षीच्या वाराणसीच्या दौऱ्यात काही विदेशी मित्र भेटले होते, आम्ही सगळे काशीच्या त्या आल्हाददायक थंडीत बोटीत बसून धुक्यात दडलेल्या गंगेची बोटीने सफर करत होतो, काही वेळाने सूर्योदय व्हायला सुरुवात झाली आणि उदयास येऊ लागलेल्या त्या लाल गोळ्याची किरणं गंगेवर पसरलेल्या धुक्यावर पडायला लागली. हे सगळं समोर होत असताना मागून अलवार पणे बासरीचे स्वर ऐकू यायला लागले, पाहतो तर तो आमच्यापैकीच एक विदेशी मित्र होता हे सगळं इतकं सुंदर होतं की मी सवयीप्रमाणे खिशातून फोन काढला आणि व्हिडिओ घेण्याचा विचार करू लागलो, मी फोन काढल्याच्या नंतर सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले मला थोडं Awkward वाटलं म्हणून मी फोन ठेऊन दिला आणि तो क्षण अनुभवण्यात विलीन झालो. 

या बोट राईडच्या नंतर मला बोटीत असलेल्या विदेशी मित्रांपैकी एकाने हा प्रश्न विचारला की तू इथे का आला आहेस ? साहजिकच माझं उत्तर होतं मला आनंद मिळण्यासाठी त्यावर तो म्हणाला की जर तुला आनंद मिळवण्यासाठी आला आहेस तर हे क्षण एन्जॉय का नाही करत ? तुझा आनंद हा अनुभव घेण्यात आहे ना की तो रेकॉर्ड करून जगाला दाखवण्यात. त्या क्षणापासून एक गोष्ट क्लिअर झाली की समोर असणारा क्षण ना क्षण जगून घ्यायचा, कारण त्यापेक्षा अनमोल असं काहीच नसतं !

बऱ्याचदा कुठेतरी बसलेलो असताना एकदम सुंदर वातावरण होतं, कधीकधी सूर्यास्त वगैरे असतो. मित्र लाईव्ह चालू करतात कोणी व्हिडिओ काढत असतं मला हे सगळं पाहून विचित्र वाटतं पण मी इग्नोर करतो

मागे न एक कविता वाचलेली, कवितेचा असा सार होता की वस्तू सुद्धा बोलतात, कथा सांगतात हे वाचून जरा वेगळं वाटलं होतं पण यावेळी हंपीत असताना लिटरली ते अनुभवलं, विजय विठ्ठल मंदिरातले ते खांब, त्या खांबावर असणारी नक्षीदार शिल्प हे सगळे जणू आपल्याशी संवाद करत आहेत असं वाटत होतं. अगदी भग्न झालेले माही अवशेष त्यांचा मोठ्या अभिमानाने इतिहास सांगत होत्या तो ऐकू येत होता, इतकंच नाही तर मातंग पर्वतावरून उगवताना दिसणारा सूर्य मला कडकाच्या थंडीत ऊर्जा देत होता तर हेमकूटावरून मावळणारा सूर्य मला शेवट सुद्धा किती सुंदर असू शकतो याची जाणीव करून देत होता.

हे सगळं पाहत असताना जी तंद्री लागते ना ती कमाल असते, माणूस सगळं विसरून त्या गोष्टींमध्ये इतका विलीन होतो की त्या सगळ्या प्रतिमा, वेगवेगळ्या अँगलने टिपलेल्या वेगवेगळ्या फ्रेम्स हे सगळं मनात अगदी खोलवर कोरलं जातं.

गेल्या काही दिवसात पाहिलेल्या काही गोष्टी इतक्या जगल्या आहेत की आता काही फोटो काढलेले असतात ते पाहण्याची इच्छा सुद्धा होत नाही, या जगलेल्या गोष्टींवर जर लिहायचं ठरवलं तर हजारेक शब्द सहज लिहून होतील हे असं बोलणं कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण कधीतरी जर हे असे क्षण स्वतःसाठी जगले असाल तर हे नक्कीच रियलाईझ होईल.

तन्वीर सिद्दीकीची एक कविता आहे, तो म्हणतो की

"काही कागद चुरगळून फेका, काही कागद कोरेच ठेवा.
सगळ्याच आठवणी लिहायच्या नसतात,
लिहू सुद्धा नका !
काही क्षण असेच कायम तुमच्या सोबत असुद्यात"

किती सुंदर आहे ना हे सगळं ? तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फक्त फोटो काढलेले असतील ते तुम्हाला शेकडो लाईस वगैरे मिळवून देतील सुद्धा पण तो क्षण जो मी जगेल तो मला त्या लाईक्सपेक्षा जास्त आनंद देणारा असेल, अगदी आयुष्यभरासाठी म्हटलं तरी सुद्धा !

श्रीपाद कुलकर्णी
०२/१२/२०२०


Thursday, 23 April 2020

सुबह ए बनारस

#सुबह_ऐ_बनारस 

तसा माझा दिवसातला सगळ्यात आवडता वेळ हा संध्याकाळचा असायचा आज ही आहे. खूप काही होत अस सगळ्यांना ऊर्जा देणारा सूर्य शांतपणे खाली जात असतो, लोक घरी येत असतात, दमलेले असतात पण घरी येणार म्हणून समाधान वगैरे असत. पक्षांची किलबिल चालू असते आणि घरट्यात जाण्याची तयारी सुद्धा. अस खूप काही होत या वेळेत. प्रत्येकाच्या नजरेवर ते डिपेंड करत, अजून कोणासाठी हे वेगळं असेल,पण या संध्याकाळ आवडण्याला बनारस अपवाद ठरलं. बनारस ला गेलो आणि तिथल्या सकाळ च्या वातावरणावर केव्हा प्रेम जडलं ते कळलंच नाही.

तिथे सूर्योदयाची वेळ म्हणजे पहाटे 5 ते 6.30. (ऋतूनुसार बदलत असते पण या दीड तासात कधीही) सकाळी सगळीकडे प्रसन्न वातावरण असत, आल्हाददायक थंडीची चादर पसरलेली असते या वातावरणात मस्त अंघोळ वगैरे करून बाहेर पडावं, नंतर काशी कॅफे मद्धे कुल्हड़ मधली स्ट्रॉंग कॉफी प्यावी आणि फ्राईड इडली फ्राईड वडा चा ट्रॅडिशनल ब्रेकफास्ट करून घाटाकडे निघावं.

या घाटांवर एवढ्या गोष्टी एकाच वेळी घडत असतात की विश्वास बसणार नाही. हो म्हणजे काही लोक गंगेत अंघोळ करत असतात, गंगेची आरती चालू असते, काही नावाडी आपली नाव तयार (प्रिप्रेशन) करत असतात, मद्धेच एखाद्या बाजूजे बासरीचे स्वर ऐकायला येतात, तर कधी बाजूला मांझी सारखा 'भवरवा एतोहरा संदेस' गाणारा दिसतो. कोणी मॉर्निंग वॉक ला आलेलं असत तर कोणी स्पेशल अस्सी घाटावर चहा पिण्यासाठी आलेला असतो. खूप साऱ्या प्रकारचे खूप लोक इथे असतात. 

माझ्या दिवसाची सुरवात तर इथेच घाटावर व्हायची. सकाळी आवरून घाटावर जायचं, किंचित उजेडायला लागलं की मग बोटीत बसायचं आणि बोट राईड घ्यायची. हो थोडे कुडकुडत जरी असाल तरी त्या थंडीचा आनंद घ्यायचा कारण थोड्या वेळात सूर्योदय होऊन ऊन पडायला लागत आणि उष्णता निर्माण होते.

शांत वाहणारी गंगामाई, त्यावर पसरलेली धुक्याची चादर आणि त्या चादरीत मस्त बागडणारे सायबेरीयण पक्षी. अश्या सगळ्यात आपण बोटीतून हे सगळं पाहात बसायचं. नकळत तिकडे वर तो सूर्याचा तेजस्वी लाल गोळा वर सरकतच असतो त्यात तुमच्यासोबत जर कोणी आर्टिस्ट (वाद्य वाजवणारा/गाणारा) असेल तर सोने पे सुहागा. (येस आपुन के साथ थे, और ओ भी जितने दिन था उतने दिन दिन, त्यावर वेगळं लिहिल मी.) मस्त अंधारात सुरू झालेला प्रवास ७.३० पर्यंत ऊन पडेपर्यंत संपून जातो, गंगेचे पहाटेचे रूप आणि हे आत्ताच रूप पूर्णपणे वेगळं असत. गंगेचे सगळे घाट ही नावाडी लोक तुम्हाला माहिती देत फिरवून आणतात आणि शेवटी जिथे तुम्ही बसलेला असता तिथे सोडतात.

पण काहीही अस ना तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणच्या चालू असलेल्या वेगवेगळ्या क्रिया या खूप मनात भरून जातात, जस की हरिश्चंद्र माणिकर्णिका वर चालू असणारे अंत्यविधी असतील अस्सी घाटावर वॉक ला येऊन गिटार वाजवत असलेले कपल्स असतील किंवा मग दशाश्वमेध घाटावर स्नान संध्या करून तपश्चर्येला बसलेले साधू असतील किंवा मद्धेच कुठेतरी कोणी मासे पकडण्यासाठी गळ लावून बसलेला लहान सहान मुलगा सुद्धा दिसेल किंवा एखादे म्हातारे आजोबा सुद्धा असतील.

हे सगळं एवढं मस्त वाटत असते की इथून पाय निघत नाही.एकंदरीत काय तर तिथली सकाळ जास्त सुंदर असते, कोणी या सगळ्या वातावरणाच्या प्रेमात नाही पडला तर नवलच..!

-श्रीपाद 
-४/१२/१९

#First_Solo_Tour #Banaras 

Sunday, 29 March 2020

सुखाची व्याख्या

आपल्याला सगळ्यांनाच रोज चालू असलेल्या आपल्या नियमित जीवनाचा कंटाळा कधीतरी येतोच ना? मग मनात कसबस होत अस्वस्थ वाटायला लागतं. मग अश्या वेळी जरा माझं एका आणि मी सांगतो तस जगून पहा ना...

पळापळीतुन निवांत आपला एक दिवस काढायचा, फोन ला सुट्टी द्यायची, कॅमेरा घ्यायचा सोबत.. कोणी असू नसू आपण आपलं निघायचं. निसर्गात हरवून जायचं. ते सौंदर्य अनुभवायचं. डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवायच.हेडफोन्स न लावता वाऱ्याच्या संगतीने पक्षी गात असलेलं  संगीत ऐकायचं. तहान लागली की झऱ्याच/टाक्यातल मस्त गार पाणी पोटभर प्यायचं. दम लागला की झाडाच्या सावलीत अंग टाकून द्यायचं. 

सगळं फिरून झालं की पोटात भुकेने व्याकुळ झालेलं कावळे केव्हाच ओरडायला लागलेले असतात, मग नकळत पाऊले निघतात ती आज्जीच्या झोपडी कडे, जसे जसे जवळ पोहचू तसा तसा त्या चुलीवर शिजणार्या गडकिल्यांच्या खोऱ्यात पिकलेल्या तांदळाच्या भाताचा चुलीवर शिजत असतानाचा सुवास येऊ लागतो. आणि हा असा भात मला नाही वाटत जगात कुठे मिळत असावा.. नंतर तिथे पोहचताच मस्त लिंबू सरबत प्यायचं, आणि फ्रेश व्हायचं. तोवर आज्जीच्या घरच्यांनी गरम गरम भाकरी भाजीच ताट वाढलेलं असत, असेल त्या बेतावर यथेच्छ ताव मारायचा... 

इथे आपली मज्जा असते, ही लोक जेवण हे सेवा म्हणून देतात. तिथे फक्त नफा कमावणे हा उद्देश कधीच नसतो.तुम्हाला हवं तसं ताटात आनंदाने वाढलं जात, ते खायचं कारण त्या चुलीवरच्या जेवणाची सर कुठल्याच जेवणाला कधीच येऊ शकत नाही. हे सगळ होईपर्यंत सूर्य ढळायला आलेला असतो, वेळ होते, आणि मग तिन्हीसांजेच्या वेळेला परतीच्या प्रवासाच्या दिशेने पाऊल वाट चालायला लागतात....या सगळ्यात मिळालेली मानसिक ऊर्जा पुढच्या प्रवासापर्यंत जगण्यासाठी पुरेशी असते...

आणि हो तुम्हाला माहितीये, या आज्जीच्या झोपडीत भलेही लाईट नसेल,पण इथून तृप्त झालेल्या जीवांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाने ही झोपडी किती उजळून निघत असेल हे वेगळं सांगायला नको....

भटक्याच्या डायरीतुन 
20/01/2020

Wednesday, 25 March 2020

लिफ्ट

रस्त्याला उभे राहून हात करून वाहन थांबवायच आणि थोड्या अंतरासाठी त्यांची मदत घ्यायची हा सुद्धा एक प्रवासाचाच भाग ना तर त्यावरचा हा एक अनुभव...


आजचा दिवस तसा मस्त गेला. 

सकाळी रूममेट चा कॉल आला, अरे $*@*#(#% इंटर्नशिप चा क्लीअरन्स चा आज शेवटचा दिवस आहे. कधी येतोय ? येतो म्हणलं,आवरलं आणि निघालो.बाईक वर जायचं होतं पण तिकडे बेक्कार पाऊस आहे आणि अस्मादिकांच्या डांगीत खूप किडे आहेत सो घरचे लै विचारतात करतात गाडी द्यायला 😅 असो.




स्टँड ला आलो तर कळलं माळशेज च्या घाटात दरड कोसळली आहे सो तिकडच्या बस बंद आहेत. मग काय मस्ती मोड ऑन झाला इथे आपला. मग आपण एका कार ला लिफ्ट मागितली, त्याने दिली पुण्याचा होता.नितीन नाव होतं म्हणे,मालकाला इथे सोडलंय,घरी मॅम ला गाडी लागते म्हणून सरांनी परत पाठवलंय.माझे तेवढेच खर्चाचे पैसे सुटतात म्हणून नीट वाटणारे लोक घेत असतो. इथून पुढे मग आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाली, १५ हजारांपर्यंत पगार मिळतो म्हणे सगळं मिळून.त्याने मला ३५-४० मैल सोडलं. हो नाय हो नाय करत नॉमिनल पैसे दिले त्यांना आणि थँक्स बोलून निरोप घेतला.

मग आपण ट्रक ला लिफ्ट मागितली,२० मैल ट्रक मद्धे गेलो.आप्पा नाव होतं ड्रायवर च, ड्रायव्हर बीड चा होता, चाकण ला जात होता Midc मधून ऍग्रीकल्चर शॉप च सामान घेऊन जायचं होतं म्हणे त्याला. इथे सुद्धा मग पगारपाण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गप्पा झाल्या. भाऊ म्हणे ९० लावल्याशिवाय आपण गाडी ला हात लावत नाही,आणि लावला तर गाडी नीट चालत नाय. (बेंचो अवघड असतात ना ड्रायव्हर लोक पण) तो टाकळी मद्धे थांबला मग त्याला पैसे दिले आणि टाटा केला.

नंतर लालपरी ने टाकळी ते आळेफाटा गेलो ते कॉमन होत . 😂

नंतर परत कार ला लिफ्ट मागितली,तो व्यक्ती डॉक्टर होता. खेडेगावात खूप सहज लोक लिफ्ट देतात ( अर्थात थोबाड पाहूनच 😂) ते क्लीनिक ला जात होते. सिजन आहे वगैरे गप्पा झाल्या मला फुकटचे सल्ले तत्वज्ञान वगैरे देण्यात आल,आणि नशिबाने हे अंतर कमी होत तर यांनी मला रूम जवळ सोडलं. आणि ते पुढे गेले. पैसे नाय घेतले देत असून पण, म्हणे पाऊस आहे म्हणून मदत केली थँक्स बोललो. चहा ऑफर केला पण त्यांना घाई होती सो ते गेले.

परत घरी येताना सुद्धा सेम प्रकार केला रिस्क आहे यात मान्य आहे, पण मज्जा आहे फायदे आहेत.

काही फायद्याच्या गोष्टी :-

◆ पैसे कमी लागतात.
◆ खूप अफाट माहिती मिळते.
◆ वेळ कमी लागतो.
◆ मनोरंजन होते.
◆ ओळखी होतात.
◆ आणि माणसं वाचायला मिळतात

मागच्या काही दिवसांपासून (महिन्यांपासून) हा प्रकार आवडायला लागला आहे. खूप लोकांची जीवनपद्धती कळते,आर्थिक गोष्टी असतात ज्या शक्यतो कोण सांगत नाय. पण अश्या प्रवासांत याच गोष्टींवर जास्त चर्चा होते,अनुभव येतात. 

तर आजचा दिवस संपतोय दिवसभर ९ वाहनांतून सुमारे २१० किलोमीटर चा प्रवास केलाय ३०० रुपये खर्च झालेत आणि १५ नवीन लोक भेटलेत.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.

डायरीतल्या गोष्टी.

-श्रीपाद कुलकर्णी