Saturday, 8 May 2021

कासव महोत्सव !

आंजर्ले !

सागरी कासवं पाहणं ही गोष्ट मला माहिती आहे की कासव सारखा चित्रपट पाहून बऱ्याच लोकांच्या अगदी बकेट लिस्ट मध्ये असावी, अर्थात माझ्या सुद्धा होती आणि सुदैवाने ती पूर्ण सुद्धा झाली. आपल्याकडे कोकणच्या सागरी किनारपट्टीवर दरवर्षी Olive ridley या नामशेष होत असलेल्या सागरी कासवाच्या प्रजातीचं संवर्धन केलं जातं, भाऊ काटदरेंनी चालू केलेला हा उपक्रम गेल्या २० वर्षांपासून कोकणातील लोकं उत्साहाने राबवत आहेत व दिवसेंदिवस अधिकाधिक प्रमाणात हे संवर्धनाचं काम मोठं होत आहे. 

या कासवांचं आयुष्य आणि त्यांचा प्रवास याबद्दल जाणून घेणं ही फार रंजक गोष्ट आहे. या गोष्टींवर गप्पा मारत असताना वेळ कसा पटकन संपतो हे कळतही नाही. समुद्रात गेलेल्या १००० कासवांपैकी केवळ १ कासव हे त्याचं संपूर्ण आयुष्य जगतं यावरून आपल्याला याचा अंदाज येईल की या प्रजातीचं संवर्धन किती महत्वाचं आहे.


नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात साधारणपणे या प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालायला समुद्र किनाऱ्यावर येते, ही मादी एकाच वेळेला भरपूर अंडी देते, यांची संख्या साधारण ३० ते ६५ पर्यंत देखील असू शकते. मग या मादीने दिलेली अंडी समुद्रकिनाऱ्यावरचे इतर प्राणी खाऊ शकतात त्यामुळे त्यांना उचलून तयार केलेल्या हॅचरीमध्ये नैसर्गिक पद्धतीने ठेवली जातात आणि मग काही दिवसांनी या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. 

ही बाहेर आलेली पिल्ले समुद्रापासून काही मीटरच्या अंतरावर सोडले जातात तेव्हाचा हा कासवांचा समुद्रात जाण्याचा प्रवासाचा हा सोहळा अक्षरशः पाहण्यासारखा असतो. इतक्या महाकाय सागरात जाण्यासाठी धडपड करणारे ते इतकेसे कासवाचे पिल्लू लाटेसोबत परत येऊन सुद्धा अगदी आहे त्याच  वेगाने परत समुद्रच्या दिशेने जातं, आणि हे सगळं पाहणे फार आनंद देणारे असते. म्हणजे आयुष्यात अगदी एकदा तरी पहावी अशी ही गोष्ट आहे. मी तर म्हणेल की हे पाहताना तुम्ही केव्हा त्या कासवाच्या समुद्रात जाण्याच्या प्रवासासोबत एकरूप होऊन जाता हे कळत सुद्धा नाही.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासव महोत्सव नसल्याने समुद्रकिनारे अगदी मोकळे होते आणि त्यामुळे हे कासवांना पाहण्याचे क्षण अगदी मन भरून अनुभवता आले, या कासवांचा प्रवास, यांचं आयुष्य हे सगळं मोहन दादांकडून जाणून घेता आलं, त्यांच्या सोबत बोलण्यातून ते व त्यांची टीम यांच्याद्वारे केल्या जात असलेल्या कामाबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला, अशा लोकांमुळेच निसर्ग टिकून आहे असं आपण म्हणू शकतो.

तर कासवं पाहण्यासाठी असणारा हा कासव महोत्सव कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळास आणि आंजर्ले या गावांच्या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवाची घोषणा झाल्यानंतर व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या तारखांना उपस्थित राहून तुम्ही या कासव महोत्सवाचा आनंद घेऊ शकता.



No comments:

Post a Comment