Wednesday, 28 July 2021

वयात आलेल्या मैत्रिणीला पत्र

एका नुकत्याच वयात येत असलेल्या मैत्रिणीसाठी हे लिहिलं होत, पण अजून सुद्धा कोणालातरी रिलेट होऊ शकतं असं वाटतंय म्हणून पोस्ट करतोय...

प्रिय ....

तू रिलेशनशिप मद्धे जातेय खर तर तुझ्या या निर्णयाने मी खुश आहे. कारण ठीक आहे वय आहे, तुला हे सगळं आवडतंय तुला आनंद मिळतोय, मग तू हे करायलाच हवं. अर्थात जगाला फाट्यावर मारूनच...!! 

पण या सगळया गोष्टी ज्या आहेत ना अग, तर त्या दुरून डोंगर साजिरे वगैरे आपण ऐकतो ना तश्या असतात हे माझं प्रामाणिक मत आहे बघ. एकतर प्रेम ही भावना नीट समजलेली असते की नाही इथून सार काही सुरू होत आणि नंतर खूपदा तू मला ओळखलेच नाही रे इथे येऊन हे सगळं संपत.

म्हणजे म्हणतात ना प्रेम आंधळं असत, हो प्रेम अंधळच असत कारण ते होत. जर ठरवून केलं तर त्याला प्रेम हे नाव योग्य असणार नाही आणि ते होणार सुद्धा नाही हे ही खरं आहे. पण हे सगळं करताना साला बाकीच्या गोष्टी सोडून कस चालेल यार.?? जस की तुमचे भविष्यातली ध्येय, तुमच्या पालकांविषयी असणारे विचार, तुमची पार्श्वभूमी, तुम्ही जे केलंय, जे करत आहेत, जे कराल ते सगळं विचाराने व्हायला हवं ना.

प्रेम वगैरे म्हणलं की येतात त्या बाकीच्या गोष्टी ज्या की अनावधानाने होऊन जातात, आणि त्याचा गिल्ट कित्येक दिवस मनावर अधिराज्य गाजवून त्रास देत असतो. मनात हे सगळं कुठेतरी सलत असत. हे सगळं होऊन जात तेव्हाची मनाची परिस्थिती वगैरे सगळं माहिती आहे मला सुदधा. पण प्रेमाला एक दृष्टी हवी ना, आपली बंधन आपल्याला माहिती असावीत ना.

या सगळ्यात शाररिक संबंध वगैरे या गोष्टी मला किरकोळ वाटतात. २ जीवांची गरज बास एवढीच काय ती व्याख्या आहे माझ्यासाठी त्याची. आणि ते आज काय उद्या काय किंवा तुझं लग्न झाल्यावर काय कधीतरी होणारच आहे. पण या वयात त्या एका गोष्टीने तुझ्या मनावर, तुझ्या करिअरवर, तुझ्या एकंदरीत आयुष्यावर होणारे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत हे जास्त भयानक आहे.

सगळ्याच गोष्टींची उदाहरणे देण्याची गरज कधी पडू नये अस नेहमी वाटतं पण करणार काय जर ते प्रेम हे तुझ्या आयुष्याचा विध्वंस करणार ठरणार असेल तर ते एकदा तुझ्या लक्षात आणून देणं हे मी माझं काम समजतो आणि जर हे मी नाही करू शकलो तर पुढे जेव्हा काही होईल त्याचा काही अंशी जबाबदार मी सुद्धा असेल अस म्हणायला तू मागे पुढे पाहणार नाही आणि ते खरं सुध्दा असेल.

बघ या सगळ्या बोलण्याचा राग येऊ शकतो. आपण आत्ताच कुठे हे सगळं करतोय आणि हा काय उपदेशाचे डोस पाजतोय अस ही वाटू शकत, या वरून तू चिडशील, माझ्यावर नाराज होशील, चालेल होऊदेत. पण या गोष्टी आत्ताच्या परिस्थितीला तुझ्या लक्षात आणून देणं हे नितांत गरजेचं वाटत मला....

थोडक्यात सांगण एकच असेल की एखाद्या गोष्टीत स्वतःला झोकून देण्याला कुठेतरी मर्यादा नक्कीच असाव्यात ज्या तू पाळशील ही अपेक्षा आहे. हे सगळं विचार करून पाहायला जड नक्कीच जाईल, मला कळतंय. पण थोडासा प्रॅक्टिकली विचार करून बघायला काय हरकत आहे ना एकदा..??

श्रीपाद कुलकर्णी
#shreewrites
२६/०९/२०१९

No comments:

Post a Comment