Monday, 20 December 2021

Scrapbook 1 | Elena

फिरण्याच्या मागे असणार्या असंख्य कारणांपैकी एक म्हणजे माणसांच्या गोष्टी ऐकणे, गप्पा मारणे आणि नवीन लोकं जोडणे..

हेच नवीन लोकं जोडत असताना सहज मनात आलं की आपण याचं एक स्क्रॅपबुक का करू नये, स्क्रॅपबुक जरी मर्यादित लोकांसाठी असलं, जरासं खाजगी असलं तरीही आजच्या इंटरनेटच्या जगात कुठे म्हणावी अशी प्रायव्हसी राहिली आहे तेव्हा मी हे पब्लिक केल्याने काही फरक पडेल..

तर माझ्या या स्क्रॅपबुक च्या पहिल्या पानावर येण्याचा मान एलिनाचा, आत्ता इतक्यातच बनारसच्या सोलो ट्रिपवर होतो तेव्हा भेटलेल्या काही खास व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे एलिना !

तशी ती इटलीची, आणि फक्त इटलीचीच नाही तर इटलीतल्या रोम मधली.. टुरिझम फिल्ड मध्ये काम करत, आपल्या आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ पैसे कमावण्यासाठी या मॅडम जगत होत्या, स्वतः ट्रॅव्हल फिल्ड मध्ये असल्याने फिरण्याची आवड तर होतीच, असंच फिरत फिरत या बाई पोहचल्या बनारस मध्ये, त्या इकडे येतात काय, काही दिवस राहतात काय आणि अगदी इकडच्याच होऊन जातात काय हे प्रचंड भारी आहे आणि कदाचित यामुळेच मला तिच्याबद्दल लिहावं वाटत असेल..

ती जनरली तुम्हाला घाटावर भेटेल, कुठल्यातरी भिकारीसारख्या माणसासोबत चहा पिताना किंवा एखाद्या साधू सोबत जॉइंट मारताना किंवा अगदीच कधी कुत्र्यांसोबत खेळत असेल. आम्ही सुद्धा असेच काहीसे भेटलो, घाटावर बसलेलो असताना हाय हॅलो झालं आणि मग पुढे नाव गावाची चौकशी झाल्यावर बनारस बद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्याकडे असणार्या ऐतिहासिक वास्तू रोम मधल्या काही वास्तू त्यात असणारं साम्य यावर सुद्धा ती सांगत होती. मी सुद्धा नगरच्या काही ऐतिहासिक वास्तूंचे फोटो दाखवले तेव्हा 'इंडिया इस सो ब्युटीफुल बट कंपेअरली ईट्स व्हेरी अंडररेटेड' असे उद्गार निघाले जरा गप्पा झाल्यावर आणि मी सुद्धा टुरिझम कंपनीसाठी काम करतो हे समजल्यावर आमचे नंबर्स आणि इंस्टाग्राम आयडी एक्सचेंज झाले, मी आठवणीने सेल्फी घेतला आणि परत भेटू या नोट वर निरोप झाला.

२ दिवसांनी तिचा मेसेज आल्यावर आम्ही परत एका सकाळी पांडे घाटापासल्या नंदेय कॉफी शॉपला भेटलो, यावेळी बोलताना असलेला विषय हा फक्त भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्र हा होता. हातात बांगड्या, पायांत पैंजण, टिकली, आणि वर शेंदूर इतका अगदी टिपिकल बनारसी बाई सारखा तिचा पेहराव होता. एखादी व्यक्ती एखादी संस्कृती इतक्या लवकर कशी अंगीकारु शकते या गोष्टीचं मला फार कौतुक वाटलं, मी तिला जेव्हा हे विचारलं तेव्हा तिने तिचा या गोष्टींवरचा तिचा दृष्टिकोन सांगितला, आपली संस्कृती एखाद्याला इतकी आवडते हे ऐकून मला छान वाटलं. कोरोना मुळे कित्येक वाईट गोष्टी झाल्या असतील पण एलिना सांगते की लॉकडाउन लागण्यामुळे तिला इकडे राहावं लागलं, आधी जरा नकोसं झालेलं पण हळूहळू बनारसच्या प्रेमात या बाई पडल्या आणि आता यांचा पाय निघत नाहीये.

स्वतःचं भाड्याने घर घेऊन ती बनारसमध्ये राहतेय, तिला इकडे साधारणपणे वर्ष झालं  आहे आणि पुढे अजून किती दिवस असणार हे विचारलं की ती फक्त 'शिवा नोज' असं हसून सांगते. महादेवावर प्रचंड श्रद्धा आहे तिची, इतकी की तिने आजवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी ८ ज्योतिर्लिंगांना भेट सुद्धा दिली आहे. अजिंठा, वेरूळ तिला फारच आवडलं आहे तर ती शिर्डी ला पण येऊन गेली आहे थोडक्यात काय तर या मॅडम आता नॅशनलिटी सोडली तर भारतीय झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही...

सध्या फ्रीलांस टूर डिझायनर म्हणून ती काम करत गरजेपुरते पैसे कमावते... ती सांगते मी माझं आजवरचं आयुष्य संसारासाठी आणि पैसे कमावण्यासाठी घातलं, त्यात चांगले पैसे सुद्धा कमावले, भरभरून सहजीवन जगले, सेव्हिंगस सुद्धा आहेत पण आता माझी माझ्यासाठी जगण्याची वेळ आली आहे, मी किती दिवस अशी जगेल माहिती पण पण मला हे आवडतं आहे आणि मी जीवनाचा आनंद घेत आहे.

आत्ता हे सगळं जरा विचित्र वाटेल, मागे असणाऱ्या लोकांचं काय, भविष्याचं काय वगैरे प्रश्न सुद्धा पडतील पण हे असे प्रश्न मुसाफिरांना पडतही नाहीत आणि त्यांना कोणी विचारू ही नये कारण या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर कदाचित जगणं राहून जाईल...!

#shreewrites 
#Scrapbook_of_shree 

१६/१२/२०२१

Friday, 26 November 2021

Divided by cities united by Music ! ❤️



What a crazy night it was ! 

इकडे वाराणसीत येण्याचा यावेळी एकच उद्देश आहे की जे छान वाटतंय ते करायचं, साईट सियिंग वगैरे गोष्टींचं प्रेशर अज्जिबात नाही.. मस्त खायचं, हॉस्टेलवरच्या लोकांसोबत रात्री चिल्ल करायचं आणि घाटांवरून फिरायचं इतकंच काय ते सुरू आहे गेल्या ४ दिवसांपासून..

याआधी आलो आहे तेव्हा शिवणापाणीचा खेळ खेळत सगळं कव्हर करून झालं होतं पण ते म्हणतात ना बनारस हे पाहण्याचं नाही तर ते अनुभवण्याचं शहर आहे तर हा अनुभव कुठे आला आहे असं वाटत नव्हतं त्यामुळे यावेळी काहीच प्लॅन नाहीये, उठायचं आणि वाटेल ते करायचं, खायचं आणि झोपायचं हाच काय तो प्लॅन !

काल सुद्धा असाच रोजच्यासारखं दशाश्वमेध घाटावरून आरती झाल्यानंतर फिरायला निघालो, दशाश्वमेधच्या बाजूने अस्सीघाटाकडे येत होतो आणि येताना नेहमीप्रमाणे निरीक्षणं सुरूच होती याच वॉल्कच्या दरम्यान राजा घाटावर बसलेली इटलीची Elena भेटली, जी मागच्या 2 वर्षांपासून इकडे राहते आहे. तिने आवाज दिला, मग तिच्यासोबत बसून अर्धा तास गप्पा झाल्या, नंबर्स, इन्स्टाग्राम id एक्सचेंज झाले आणि परत भेटण्याच्या गोष्टीवर निरोप घेतला. 

आजची संध्याकाळ चांगलीच हॅपनिंग आहे कुठेतरी वाटतंच होतं पण कुठून तरी हा आवाजही येत होता की पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, अस्सी घाटावर पोहचलो, आणि एका जॉईंटवाल्याला मॅगी तयार करायला सांगितली तर कानांवर बासरीचे अतिशय सुमधुर स्वर ऐकायला यायला लागले म्हटलं मॅगी तयार होईपर्यंत शेजारी घाटावर बसावं तर तिकडे गेलो आणि नंतर जे काही झालं ती सगळी एक जादू होती..

आनंददिप मुरली नावाचा शास्त्रीय संगीत या विषयात PHD करत असलेला आणि अब्रॉड लोकांना बासरी शिकवणारा माणूस तिकडे एकटाच बासरी वाजवत होता आणि सुरवातीला मी आणि माझ्यासारखेच अजून 4 डोके ते ऐकत आनंद घेत होते. हळूहळू जशी रात्र व्हायला लागली तसे आमच्यातल्या एकेकाचे सुप्त गुण बाहेर यायला लागले, (अगदी माझ्यातला सुद्धा बेसूर गायक कधी नाही ते जागा झाला होता), या मैफिलीत शेवटचा तासभर जे जॅमिंग झालं ते बाप होतं, आजपर्यंत कधी अशी मैफिल अनुभवली नसेल असा तो अनुभव होता..

बरीच रात्र झाल्याने आम्हाला शेवटी उरकतं घ्यावं लागलं पण तोपर्यंत बरीच गाणी गाऊन, ऐकून झाली होती.. घाटांवर फिरण्यात एक वेगळीच मजा आहे, तो फील शब्दांत व्यक्त करता येईल असा नक्कीच नाहीये, त्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल. इथे तुम्हाला अगदी सगळ्या प्रकारचे लोकं भेटतील, या लोकांशी गप्पा मारण्यात एक जादू आहे ती अनुभवता येईल पण त्यासाठी तुमच्याकडे फक्त वेळ असावा लागेल आणि कम्फर्टझोन च्या बाहेर जाण्याची तयारी !

मस्का नावाच्या मूवी मध्ये एक डायलॉग आहे, ये दुनिया है ना वो इलेमेंट्ससे नाही बनी है, ये दुनिया स्टोरीज से बनी है. यहा हर कोई स्टोरीटेलर है और हर किसिकि स्टोरी है आणि याच गोष्टी मला ऐकायला आवडतात आणि त्यासाठी मी फिरत असतो...

फोटोमध्ये व्हिक्टरी पोज दिली आहे तो आनंददीप आहे जो या मैफिलीचा कर्ताधरता होता, या फोटोत आनंददीप आणि सचिन (उजवीकडे डेनिम शर्ट घातलेला) हे दोघे सोडले तर बाकी कोणीच एका शहरातलं नव्हतं. असे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले फक्त म्युझिक या एका शब्दावर एकत्र झालेले लोकं जेव्हा भेटतात आणि गातात तेव्हा त्यातून निर्माण झालेली ऊर्जा पुढचे कितीतरी दिवस पुरून उरणारी असते आणि ही अशीच खूप सारी ऊर्जा मिळवण्यासाठी मी आयुष्यभर फिरत राहील !

- श्रीपाद
११.०० AM
वाराणसी

#shreewrites #varanasighats #musicalnight #saturdaynight #devdiwali #solotravel

Friday, 29 October 2021

Sometimes saying let it be is good choice !

मागे माझा वाढदिवस झाला, वाढदिवसाचे प्लॅन्स कोणाचे नसतात यार, अर्थात, माझे सुद्धा होते पण त्याच दिवशी पुढे दसरा असल्याने इतकी कामं सुरू होती की फोन घ्यायला सुद्धा वेळ मिळत नव्हता, बाहेर जाणे वगैरे तर फारच लांबची गोष्ट... पण मला काम करायला आवडतं, हातात असलेली कामं पूर्ण करणं ही माझी पहिली प्रायोरिटी असते, त्यामुळे त्या दिवसाबद्दल तक्रार अशी अज्जिबात नव्हती. 

नंतर दसरा झाला, थोडासा निवांत झालो, रविवारी मस्त घरात बसून चिल्ल करू म्हटलं, पण विकेंडला शांत बसण्याची सवय नसल्याने त्यात पण बोअर झालो, मग मित्राला फोन केला आणि म्हटलं उद्या ट्रेकला जाऊयात का ? अगदी शब्द पडायचा उशीर, सकाळीच एक ट्रेक लीड करून परत आलेला तो, लगेच हो म्हणाला आणि आमचा प्लॅन फिक्स झाला !

आपल्यासारखेच मित्र असल्याचा हा फायदा असतो, कधीही, कुठल्याही प्लॅन्सला ते तयार होतात, त्यांची नाटकं नसतात आणि विशेष गंमत म्हणजे असं सगळं असूनही यांच्या बायो मध्ये कधी वंडरलस्ट किंवा ट्रॅव्हलर वगैरे शब्द तुम्हाला सापडणार नाहीत ! असो, तो भाग अलहिदा..

सगळे लोकं जेव्हा सोमवारी मंडे ब्लुज फेस करत होते तेव्हा सकाळी आम्ही मात्र मस्त राजगडकडे जायला निघालो, रस्त्यात मित्रांना भेटलो, त्यातच एक मित्र म्हणाला चल मी पण येतो, पुढच्या पंधरा मिनिटात तो सुद्धा आम्हाला जॉईन झाला आणि आम्ही राजगडाच्या दिशेने गाड्या काढल्या..

जाताना मस्त निवांत जेवण वगैरे करत गेल्याने बेस व्हिलेजपर्यंत जायला दुपार झाली होती, ऑक्टोबर हिट म्हणजे काय असतं ते अगदी चांगलंच जाणवत होतं अशा परिस्थितीत पाली दरवाज्याच्या बाजूने राजगड चढण्यास सुरुवात केली व मस्त रमत गमत ४.३० ला गडावर पोहचलो, पाली दरवाज्यातच थोडं अंग टाकलं नंतर पद्मावती माचीवर जात टाक्यातल्या थंड पाण्याने तोंड धुतलं, फ्रेश झालो आणि संजीवनीकडे सुर्यास्तासाठी गेलो, अगदी समोर दिसणारे किल्ले मनसोक्त पाहिले, संजीवनीमाचीवरून दिसणाऱ्या सूर्यास्ताचं वर्णन शब्दांत शक्य नाही ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

सगळं अगदी साग्रसंगीत झालं, रात्री शेकोटी पेटवून गप्पा मारत असताना सहज आकाशात लक्ष गेलं आणि कळलं की आज तर कोजागिरी आहे आणि मागच्या कोजागिरीला सुद्धा आपण राजगडावरच होतो. माझा जन्म सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा असल्याने तारखेने नाही तर तिथीने, मणिध्यानी नसताना वाढदिवसाचा प्लॅन तर सक्सेस झाला होता.

अगदी एकांत असलेल्या किल्ल्यावर पौर्णिमेचा शीतल चंद्र सोबतीच्या लुकलूकणार्या चांदण्या पाहत दिवस संपावा, स्वतः अगदी आनंदी असावं यापेक्षा दुसरं सुख ते कुठलं नाही का ? हेच चंद्र तारे पाहत चिलखती बुरूजावर टेंट लावून आम्ही आता सूर्योदय पाहण्यासाठी अलार्म लावत आडवे झालो.. 

सकाळी लवकर उठून सुवेळावरून त्या उगवत्या सूर्याची किरणं अंगावर घेत दुसरा दिवस सुरू झाला. समोर पसरलेले ढग, बोचणारी थंडी आणि समोरून ऊब देणारी किरणं हा संगम एन्जॉय करून सुवेळाकडून आम्ही काळेश्वरीला जायला निघालो, काळेश्वरीवरून वर चढत नंतर बालेकिल्ला केला आणि खाली उतरायला सुरुवात केली..

अचानक काही तास आधी ठरलेला हा प्लॅन अत्यंत आनंददायी आणि मनाला सुखावणारा होता, क्रीएटीव्ह फिल्ड मध्ये काम करत असताना तुम्हाला या गोष्टी कायमच गरजेच्या असतात, त्यामुळे असा एखादा अचानक सोमवारचा ब्रेक नक्की ऍडजस्ट करावा आणि स्वतःला वेळ द्यावा...

वाढदिवसाच्या दिवशी बाहेर जाणं जमलं नव्हतं, पण कदाचित याही वर्षी कोजागिरीला राजगडावरच जाण्याचा योग असावा म्हणून त्या गोष्टीचं तेव्हा वाईटही वाटलं नाही, म्हणूनच प्रत्येक वेळेस जास्त ताण न घेता गोष्टी होतील तशा होऊ द्याव्यात, बाकी युनिव्हर्सवर सोडावं, कारण कधीकधी यामुळे आलेले रिझल्ट मनाला फार सुखावणारे असतात...!

#shreewrites

Wednesday, 28 July 2021

वयात आलेल्या मैत्रिणीला पत्र

एका नुकत्याच वयात येत असलेल्या मैत्रिणीसाठी हे लिहिलं होत, पण अजून सुद्धा कोणालातरी रिलेट होऊ शकतं असं वाटतंय म्हणून पोस्ट करतोय...

प्रिय ....

तू रिलेशनशिप मद्धे जातेय खर तर तुझ्या या निर्णयाने मी खुश आहे. कारण ठीक आहे वय आहे, तुला हे सगळं आवडतंय तुला आनंद मिळतोय, मग तू हे करायलाच हवं. अर्थात जगाला फाट्यावर मारूनच...!! 

पण या सगळया गोष्टी ज्या आहेत ना अग, तर त्या दुरून डोंगर साजिरे वगैरे आपण ऐकतो ना तश्या असतात हे माझं प्रामाणिक मत आहे बघ. एकतर प्रेम ही भावना नीट समजलेली असते की नाही इथून सार काही सुरू होत आणि नंतर खूपदा तू मला ओळखलेच नाही रे इथे येऊन हे सगळं संपत.

म्हणजे म्हणतात ना प्रेम आंधळं असत, हो प्रेम अंधळच असत कारण ते होत. जर ठरवून केलं तर त्याला प्रेम हे नाव योग्य असणार नाही आणि ते होणार सुद्धा नाही हे ही खरं आहे. पण हे सगळं करताना साला बाकीच्या गोष्टी सोडून कस चालेल यार.?? जस की तुमचे भविष्यातली ध्येय, तुमच्या पालकांविषयी असणारे विचार, तुमची पार्श्वभूमी, तुम्ही जे केलंय, जे करत आहेत, जे कराल ते सगळं विचाराने व्हायला हवं ना.

प्रेम वगैरे म्हणलं की येतात त्या बाकीच्या गोष्टी ज्या की अनावधानाने होऊन जातात, आणि त्याचा गिल्ट कित्येक दिवस मनावर अधिराज्य गाजवून त्रास देत असतो. मनात हे सगळं कुठेतरी सलत असत. हे सगळं होऊन जात तेव्हाची मनाची परिस्थिती वगैरे सगळं माहिती आहे मला सुदधा. पण प्रेमाला एक दृष्टी हवी ना, आपली बंधन आपल्याला माहिती असावीत ना.

या सगळ्यात शाररिक संबंध वगैरे या गोष्टी मला किरकोळ वाटतात. २ जीवांची गरज बास एवढीच काय ती व्याख्या आहे माझ्यासाठी त्याची. आणि ते आज काय उद्या काय किंवा तुझं लग्न झाल्यावर काय कधीतरी होणारच आहे. पण या वयात त्या एका गोष्टीने तुझ्या मनावर, तुझ्या करिअरवर, तुझ्या एकंदरीत आयुष्यावर होणारे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत हे जास्त भयानक आहे.

सगळ्याच गोष्टींची उदाहरणे देण्याची गरज कधी पडू नये अस नेहमी वाटतं पण करणार काय जर ते प्रेम हे तुझ्या आयुष्याचा विध्वंस करणार ठरणार असेल तर ते एकदा तुझ्या लक्षात आणून देणं हे मी माझं काम समजतो आणि जर हे मी नाही करू शकलो तर पुढे जेव्हा काही होईल त्याचा काही अंशी जबाबदार मी सुद्धा असेल अस म्हणायला तू मागे पुढे पाहणार नाही आणि ते खरं सुध्दा असेल.

बघ या सगळ्या बोलण्याचा राग येऊ शकतो. आपण आत्ताच कुठे हे सगळं करतोय आणि हा काय उपदेशाचे डोस पाजतोय अस ही वाटू शकत, या वरून तू चिडशील, माझ्यावर नाराज होशील, चालेल होऊदेत. पण या गोष्टी आत्ताच्या परिस्थितीला तुझ्या लक्षात आणून देणं हे नितांत गरजेचं वाटत मला....

थोडक्यात सांगण एकच असेल की एखाद्या गोष्टीत स्वतःला झोकून देण्याला कुठेतरी मर्यादा नक्कीच असाव्यात ज्या तू पाळशील ही अपेक्षा आहे. हे सगळं विचार करून पाहायला जड नक्कीच जाईल, मला कळतंय. पण थोडासा प्रॅक्टिकली विचार करून बघायला काय हरकत आहे ना एकदा..??

श्रीपाद कुलकर्णी
#shreewrites
२६/०९/२०१९

Saturday, 8 May 2021

कासव महोत्सव !

आंजर्ले !

सागरी कासवं पाहणं ही गोष्ट मला माहिती आहे की कासव सारखा चित्रपट पाहून बऱ्याच लोकांच्या अगदी बकेट लिस्ट मध्ये असावी, अर्थात माझ्या सुद्धा होती आणि सुदैवाने ती पूर्ण सुद्धा झाली. आपल्याकडे कोकणच्या सागरी किनारपट्टीवर दरवर्षी Olive ridley या नामशेष होत असलेल्या सागरी कासवाच्या प्रजातीचं संवर्धन केलं जातं, भाऊ काटदरेंनी चालू केलेला हा उपक्रम गेल्या २० वर्षांपासून कोकणातील लोकं उत्साहाने राबवत आहेत व दिवसेंदिवस अधिकाधिक प्रमाणात हे संवर्धनाचं काम मोठं होत आहे. 

या कासवांचं आयुष्य आणि त्यांचा प्रवास याबद्दल जाणून घेणं ही फार रंजक गोष्ट आहे. या गोष्टींवर गप्पा मारत असताना वेळ कसा पटकन संपतो हे कळतही नाही. समुद्रात गेलेल्या १००० कासवांपैकी केवळ १ कासव हे त्याचं संपूर्ण आयुष्य जगतं यावरून आपल्याला याचा अंदाज येईल की या प्रजातीचं संवर्धन किती महत्वाचं आहे.


नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात साधारणपणे या प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालायला समुद्र किनाऱ्यावर येते, ही मादी एकाच वेळेला भरपूर अंडी देते, यांची संख्या साधारण ३० ते ६५ पर्यंत देखील असू शकते. मग या मादीने दिलेली अंडी समुद्रकिनाऱ्यावरचे इतर प्राणी खाऊ शकतात त्यामुळे त्यांना उचलून तयार केलेल्या हॅचरीमध्ये नैसर्गिक पद्धतीने ठेवली जातात आणि मग काही दिवसांनी या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. 

ही बाहेर आलेली पिल्ले समुद्रापासून काही मीटरच्या अंतरावर सोडले जातात तेव्हाचा हा कासवांचा समुद्रात जाण्याचा प्रवासाचा हा सोहळा अक्षरशः पाहण्यासारखा असतो. इतक्या महाकाय सागरात जाण्यासाठी धडपड करणारे ते इतकेसे कासवाचे पिल्लू लाटेसोबत परत येऊन सुद्धा अगदी आहे त्याच  वेगाने परत समुद्रच्या दिशेने जातं, आणि हे सगळं पाहणे फार आनंद देणारे असते. म्हणजे आयुष्यात अगदी एकदा तरी पहावी अशी ही गोष्ट आहे. मी तर म्हणेल की हे पाहताना तुम्ही केव्हा त्या कासवाच्या समुद्रात जाण्याच्या प्रवासासोबत एकरूप होऊन जाता हे कळत सुद्धा नाही.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासव महोत्सव नसल्याने समुद्रकिनारे अगदी मोकळे होते आणि त्यामुळे हे कासवांना पाहण्याचे क्षण अगदी मन भरून अनुभवता आले, या कासवांचा प्रवास, यांचं आयुष्य हे सगळं मोहन दादांकडून जाणून घेता आलं, त्यांच्या सोबत बोलण्यातून ते व त्यांची टीम यांच्याद्वारे केल्या जात असलेल्या कामाबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला, अशा लोकांमुळेच निसर्ग टिकून आहे असं आपण म्हणू शकतो.

तर कासवं पाहण्यासाठी असणारा हा कासव महोत्सव कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळास आणि आंजर्ले या गावांच्या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवाची घोषणा झाल्यानंतर व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या तारखांना उपस्थित राहून तुम्ही या कासव महोत्सवाचा आनंद घेऊ शकता.